Tuesday, 30 September 2008

कोडनेम :< इंटरनेट />रामराम ..
मी तुमच्यासारखाच एक इन्टरनेटचा चाहता.. सदैव या वेबसाईट मधून त्या वेबसाईटला जाणारा .. काहीना काही नवीन माहितीचे मार्ग शोधून त्याच्या तळापर्यंत जाणारा .. एक सर्फर .. वाटाड्या.. आणि आता तुमचा सोबती ..
मी गेले ८ वर्ष हे माहितीचं जाळं वापरतोय. अनेक बदल .. तंत्रज्ञानाची क्रांति .. वेबसाईट्स ची नवी नवी डिझाईन्स. . नव्या सुविधा .. या माझ्या डोळ्यापुढे येत गेल्या आणि मी इथेच रमलो .. मग काय घडलं असं की मी हे नवं प्रकरण सुरू केलं ? छोटासाच किस्सा आहे. पण मजेशीर आहे....

रात्रीची साधारणत: १० ची वेळ, मी आणि घरातले सर्व गप्पा मारत गच्चीत पडलो होतो. आम्ही ब-याचदा असं गच्चीत आकाश न्याहळत गप्पा मारतो. आई शिक्षिका असल्याने तिच्या शाळेतल्या गमती कळतात. मी दिवसभर काय केल? ते मी शेअर करतो आणि असेच काहीही विषय..
आईनं अचानक विषय काढला. "आमच्या शाळेत ते ---- सर आहेत ना, त्यांची दोन्ही मुलं सद्ध्या इंटरनेट घरी वापरायला शिकलीयेत. या सरांच स्वत: "MS CIT " चं ट्रेनिंग झालंय त्यामुळे तिघंही इंटरनेट वापरतात" .त्यांच BSNL कनेक्शन आहे , ते परवा काय म्हणाले की इंटरनेटचं बील खूप येतंय! [ कुठल्याही इन्टरनेट कनेक्शनचा पहिला महिना नेहमीच सुखाचा असतो कारण बील आलेलं नसतं,] " .. आत्ताच मी phone चं outgoing बंद केलं म्हणलं यावेळेस बील कमी येइल पण या वेळेस इंटरनेटमुळं दुप्पट आलंय .. याच असं करता येइल का ? की फक्त इनकमिंगच इंटरनेट चालू ठेवायच ? outgoing बंद ठेवायच ? "
आईनं इतकं निरागसपणे विचारलं आणि वर म्हणाली की माझ्या माहिती प्रमाणे असं करता येत नाही .. जर तुम्ही इनपुट दिलं नाही तर आउटपुट काय येणार .. काय रे.. बरोबर म्हणते ना मी ?
त्यानंतर त्या सरांच्या प्रश्नाला मी फक्त हसंत होतो .. गच्ची डोक्यावर घेतली होती मी !
पण ब्लॉग सुरू करण्यामागे हेच एकच कारण आहे असं अजिबात नाही .. गेल्या काही दिवसापूर्वी माझा मामेभाऊ - जयदीप इंग्लंडला शिकायला गेला. त्या मुळे त्याच्या तयारीला मदतीला मी होतोच.. घरातून परदेशात निघालेला पहिला माणूस.. त्यामुळे सर्वच उत्साहात. हे कर, ते आण, ब्यागा भर वजन कर .. एक ना दोन . .. यातच माझ्या मामाला अजुन एक चिंता .. ती म्हणजे संपर्क कसा ठेवायचा .. जयदीपनं ते थोडं थोडं करून शिकून घेतंलं होतं गेल्या वर्षभरात पण मामानं त्याकडॆ पाहिलं नव्हतं .. "आता याचं कसं होणार ? मी त्याला पाहू शकेन कि नाही ? बोलायला फोन परवडत नाही मग चॅट जमेल का मला ? " मी गेलो, त्याला धीर दिला आणि सर्व समजाऊन सांगितलं..
ब-याचदा असं होतं की या दुनियेत येतो पण माहित नसतं की या ठिकाणी काय काय आहे किंवा काय काय आपण करू शकतो. त्या मुळेच उत्साह आणि उमेद कमी होते. जी पिढी आत्ताच्या ट्रेंड्स ना जोडून घेऊ पहाते आहे .. ज्यात माझा मामा येतो आणि ते सर ही येतात. त्यासर्वांना सहज माहिती उपलब्ध व्हावी आणि चर्चा व्हावी म्हणूनच हे सर्व !