शुक्रवार, १२ डिसेंबर, २००८

हल्ला .. आणि सुटका..



खूप दिवसानी आज काही तरी लिहीत आहे .. त्या मागे कारण ही तशीच आहेत.. मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला त्या नंतर काहीच लिहावंस वाटत नव्हतं ना काही उत्साहान कराव वाटत होत.. थोडासा त्यातून बाहेर पडत होतो तोवर माझ्यावर अतिरेकी हल्ला झाला ..घाबरू नका मी अगदी सुरक्षित आहे. दोन दिवस झुंज देऊन एक एक करून ४५ अतिरेकी मारले आणि मगच ही पोस्ट लिहायला बसलो आहे.

समाजात घुसून किंवा वसती करून रहाणा-या व त्याच समाजास घोर हानि पोहोचवून विकृत आनंद मिळणा-या लोकांना आपण आतंकवादी अथवा अतिरेकी म्हणतो. माझ्याही बाबतीत असंच घडलं पण थोड वेगळं..
माझ्याच संगणकात काही काळ राहून इतरत्र पसरून स्वत:ची मुले बाळॆ वाढवून अचानक एका संगणकीय विषाणू ने माझ्या संगणकावर हल्ला केला. माझ्या हार्डडिस्कची सर्व दारे त्याने बंद केली आणि त्यामुळे मला काहीही वापरणे अशक्य झाले होते.. माझ्या संगणकावर नेहमीचे काही विषाणूरोधक [anti viruses] होते पण त्यानाही शेंडी लावून हे पसरले होते.झालं... माझं मस्तक पिसाळलं .. सुदैवाने मला [internet] मायाजालाचा संपर्क करता येत होता आणि त्यामुळे मला प्रतिकार करण शक्य झालं, AVG Antivirus, NOD 32, AVAST, Stinger, अशा अनेक तुकड्यांची मदत घेत मी ते एक एक करून सर्व टिपले .. quarantine केले आणि सुटकेचा श्वास सोडला.. आता माझ्या हार्ड डिस्कची स्थिती सुरक्षित आहे .. woooh ..
computer virus किंवा संगणकीय विषाणू हा एक प्रोग्रॅमच असतो जो स्वयंचलित असतो आणि त्याला आपल्या शिवाय दुसराच कोणितरी [नतद्रष्ट] " इसम " वापरत असतो. हा अगदी मानवी शरीराला होणा-या संसर्गासारखाच असतो. तो तुमच्या संगणकाला हानी पोचवेलच असे नाही. ते संगणकामधे बदल घडवून आणतात आणि काही काळ शांत रहातात .. त्यानंतर अचानक बदल घडवून आणतात की तुम्हाला काही ही करता येण मुश्किल होतं .. काही विषाणू आपल्या संगणकावर एखाद्या वात्रट कार्ट्यासारखे वागतात तर काही खरोखरचे सैतानाचे दूतच असतात. हे विषाणू आपली साठवलेली माहिती पूर्णपणे नष्ट करतात किंवा कधी कधी पूर्ण हार्ड डिस्कच नष्ट करण्याची क्षमता त्यांच्यात असते.
होय, संगणकीय विषाणू हल्ला हा सुद्धा पुढील युद्धातला एक प्रकार असणार आहे. या द्वारे देशांच्या सर्व्हर्स ना अनियंत्रित करून मोबाईल, मायाजाल [internet], दूरध्वनी आणि अन्य महत्वाच्या सेवा विस्कळित करणे हा त्या मागचा उद्देश असेल. त्या विरोधात ही आता काही देशांची पथके उभारली गेली आहेत. आणि त्यात आपलाही देश मागे नाही.
पण यावर उपाय काय? अगदी १००% नाही पण तात्पुरति सुरक्षा म्हणून ह्या प्रणाली वापरल्या जातात. मी काही वर दिल्या आहेत त्यातल्या काही सशुल्क आहेत तर काही विनामूल्य आहेत. ही मायाजालावरून सदैव माहिती गोळा करून नवनवीन विषाणूंशी मुकाबला करायला तयार तत्पर असतात. त्यामुळे ८०% धोका टळतो. पण त्यातून ही काही विषाणू सुटतातच जे त्याला कधीच सापडत नाहीत.
विषाणू रोधक प्रणाली म्हणजे विषाणूंचा एक कोषच असतो ज्यात ते संगणकावरील सर्व फाईल्स ना चाळताना तुलना करून पहातात आणि जर त्याच्याशी मिळता जुळता एखादा प्रकार सापडला तर तो व्हायरस किंवा विषाणू समजून मारून टाकतात. डीलिट ची पदवी त्याला देतात :D .. i mean त्याला डीलिट करतात.
प्रत्येकाला आपली संगणकीय माहिती, जुने फोटो, गाणी, खेळ, कामाचे दस्त ऐवज आणि इतर संग्रह प्याराच असतो. तो विनाकारण का धोक्यात घाला? तुमच्याही संगणकावर अशी काही यंत्रणा असायला हवी .. जी असे विषाणू शोधून ते मारू शकेल आणि तुमचा साठवलेली, संग्रहित माहिती सुरक्षित राहिल. जर या आधिच तुमच्या संगणकावर ही प्रणाली असेल तर तुम्ही कोणती वापरता ? आणि नसेल तर तुम्हाला ज्याने संगणक दिलाय त्याला त्यासंबंधी नक्की विचारा..

लवकरच प्रसारित होत आहे : सुरक्षेचे Internet Explorer मधील उपाय.