Monday, 15 August 2011

बळीराजा.कॉम - पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.


शेत जमीनींचे हस्तांतरण किंवा धरणाखाली गेलेली जमीन असो, तिथल्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो वा त्यातील सरकारची हलगर्जी भूमिका.. सर्वत्रच बोकाळलेला भ्रष्टाचार व कर्जात बुडालेली घरं शेतं असोत .. खरोखरच आपल्या अन्नदात्याची वाईट अवस्था आहे हे खरं..
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न !
शेतकर्‍याच्या आंदोलनाचा इतिहास ही बराच जुना व मोठा आहे. अनुभवातून शिकले जाणारे तंत्र म्हणजे शेती. मातीत उभं राहून पिकं वाढताना पहाण्याचा जो आनंद आहे तो जितका सुखावह तितकाच ती जळताना पहाण्याचा असह्य्य वेदनादायक. शेतकरी समाज हा आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने परखडपणे मत मांडणे सोडाच पण स्वत:च्या मनातले व्यक्त करणे ही कठीण, इतरांना जे रुचेल तेच बोलावे लागते.  अशाच समाजाला जागे करून बोलते करण्याचा हा प्रयत्न आहे असे या वेबसाईटच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. 


आजकालचे जग हे बोलणार्‍याचे, आवाज उठवणार्‍यांचं आहे.  आज इंटरनेटवर इतर समाजाला शेतकरी साहित्य व  शेतकरी संघटना या बद्दल लिहिणार्‍या वेबसाइट्स मोजक्याच आहेत. शेतकरी मित्रांना या इंटरनेटच्या युगात एक मंच मिळावा व या विषयांवर चर्चा व्हावी याच उद्देशाने ही वेबसाइट सुरु केली आहे.


श्री गंगाधर मुटे यांची ओळख मला त्यांच्या माय मराठीचे श्लोक या कवितेमुळे झाली. त्यांचा ब्लॉग वाचला गेला.  त्यांच्याच येणार्‍या विपत्रांमुळे या शेतावरच्या साध्या शब्दातील तरीही मनाला भिडणार्‍या कविता - लेखांचे व विचारांचे प्रकाशन करणार्‍या या बळीराजा.कॉम ची ओळख झाली.
http://www.baliraja.com/home

  1. वेगळे विषय, मांडणी, कला, साहित्य याबद्दल ओढीने लिहिलेले लेख  तसेच सद्य परिस्थितीवर मांडलेले सडेतोड विचार .. हेच याचे वैशिष्ट्य आहे.
  2. त्याचबरोबर नियमित भेट देणार्‍या इतर शेतकरी मित्रांनाही इथे स्वत:चे साहित्य लिहायची व इतरांना अभिप्राय देण्याची मुभा आहे.
  3. इथे नियमित येणार्‍या शेतकरी व ब्लॉगमित्रांना हवामानाचे अंदाज विविध रूपातून माहिती देण्याचा प्रयत्न ही स्तुत्य आहे.
  4. इथे वाङ्मयशेती, रानमेवा, काव्यधारा, विनोदी कविता, शेतकरी गीत, योद्धा शेतकरी, शेतकरी संघटना, शेतकरी प्रकाशन, शेतकरी संघटक, व्हिडीओज अशा दालनांमध्ये साहित्याची रचना केलेली आहे.
शेतकर्‍याच महत्व हे झाडाच्या मुळासारखं आहे ते जर उत्तम असेल तर राष्ट्रवृक्ष बहरेल, फळेल अधिक मजबूत होईल. 
जर तुम्हीही या माझ्या विचाराशी सहमत असाल .तर  एकदा जरूर भेट द्या या वेबसाईटला..